नवी दिल्ली/बीजिंग : भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गलवाण खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर फोनच्या माध्यमातून चर्चा केली असून गलवाण खोऱ्यातील वाद संवादातून सोडवण्याची मागणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी केली आहे. ही परिस्थिती शक्य तेवढ्या लवकर निवळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्यालाच जबाबदार धरत प्रकरणाच्या चौकशीची मागणी चीन परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. कणखर शब्दात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही भारताची बाजू मांडली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कणखर भूमिकेनंतर नरमले चीनचे परराष्ट्र मंत्री
जे काही गलवाण खोऱ्यात घडले तो एक पूर्वनियोजित आणि योजनाबद्ध कट होता, ज्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे एस जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली. जे काही चीनच्या बाजूने करण्यात आले, ते एक उल्लंघन असून यावर द्विपक्षीय संबंधावर परिणाम होऊ शकतात, असेही जयशंकर म्हणाले. असा पूर्वनियोजित कट रचण्याऐवजी चीनने शांततेच्या मार्गाने तणाव कमी करण्यासाठी अपेक्षित असल्याचे जयशंकर म्हणाले.
दरम्यान भारतीय सैन्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आरोप करत भारतीय सैनिकांनीच घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनने दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये सहमती झालेल्या मुद्द्यांचे पालन केले पाहिजे. समन्वय आणि संवादाची सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यकता आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या संवाद साधनांचा वापर यासाठी करावा आणि शांतता कायम ठेवावी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये म्हटले आहे.