चीनच्या उलट्या बोंबा! भारतीय जवानांनी जाणूनबुजून आमच्यावर केले हल्ले


नवी दिल्ली: काल लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन या देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान गलवान घाटीवर नेहमी आमचा अधिकार राहिल्याचे चीनच्या सरकारी मीडियाने चीनी सेनेच्या हवाल्याने दावा केला आहे. त्याचबरोबर भारतीय सैनिकांनी जाणूनबुजून आमच्या सैनिकांवर उकसवणारे हल्ले केल्यामुळे हा गंभीर संघर्ष झाला आणि त्यांचे जवान शहीद झाल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी भारताने आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावे. त्यांच्याकडून सीमारेषेचे उल्लंघन होता कामा नये, तसेच कोणतीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळेल, असे म्हटले आहे.

15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाल्याची माहिती भारतीय लष्कराने काल दिली होती. एएनआयच्या माहितीनुसार या हिंसक झडपेत चीनचेही 43 सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले आहेत. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की, चीन आणि भारतादरम्यान संघर्षात जवान शहीद झाले आहेत.

दरम्यान भारतावर चीनने आरोप केला आहे की, 15 जून रोजी दोन वेळा अवैध कारणांनी भारतीय सैनिकांनी चीनच्या सीमेत प्रवेश केला, त्याचबरोबर चीनच्या सैनिकांना डिवचत त्यांच्यावर हल्ले केल्यामुळे दोन्ही सैन्यांमध्ये झडप झाली. त्याचबरोबर चीनने भारतीय लष्कराच्या सैनिकांमध्ये गलवान व्हॅलीत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना झडप झाली, या दाव्याचा देखील विरोध केला आहे.

सीमेवर भारतीय सैनिक शहीद झाल्याबाबत विचारले असता चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. ते म्हणाले की, आमच्या सैनिकांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी सहमती देखील दर्शवली होती. पण भारतीय सैनिकांनी 15 जून रोजी सीमेचे उल्लंघन करत त्यांनी दोन वेळा आमच्या सीमेत प्रवेश केला.

प्रवक्ता झाओ लिनजियान पुढे म्हणाले की, भारताने आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवावे. सीमारेषा पार करु नये. कुठलीही समस्या निर्माण करु नये आणि एकतर्फी पाऊल उचलू नये, ज्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळेल. झाओ यांनी म्हटले की, दोन्ही देशांचे संवाद आणि चर्चेद्वारे या मुद्द्यावर तोडगा काढण्यावर एकमत झाले आहे.

दरम्यान 6 जून रोजी भारत आणि चीनमध्ये मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आले होते. पण चीनने शांततेत चर्चा करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली.

Leave a Comment