राज्यातील ‘या’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडकडीत लॉकडाउन - Majha Paper

राज्यातील ‘या’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडकडीत लॉकडाउन


मुंबई – केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेला लॉकडाऊन या महिन्याअखेर पर्यंत कायम असणार आहे. यादरम्यान अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या हेतूने केंद्राच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकारने लॉकडाऊनमधील काही निर्बंध शिथील केले आहेत. एकीकडे राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने भिवंडीत उद्यापासून १५ दिवसांचा कडकडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. भिवंडी शहर १८ जून ते ३ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे. प्रशासनाने हा कठोर लॉकडाउन कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता जाहीर केला आहे.

भिवंडी शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होत आहे. भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला. त्याचबरोबर आयुक्तांनीही या प्रस्तावाला परवानगी दिली आहे.

यादरम्यान शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचे गरजेचे असल्याने फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकाने ठराविक वेळेसाठी सुरु राहतील, असे सांगितले आहे. याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कळवण्यात आल्याचे प्रतिभा पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Comment