ज्योतिरादित्य ‘कोरोनामुक्त’ तर, आईची अद्याप कोरोनाविरोधात झुंज सुरुच


नवी दिल्ली – मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती, पण ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरी परतले असल्चाची माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे.


९ जून रोजी ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोघांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले असले तरी त्यांच्या आईची अद्याप कोरोनाविरोधात झुंज सुरूच आहे. अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याबाबतची माहिती देताना, देशाचे आणि राज्याचे लोकप्रिय नेता ज्योतिरादित्य शिंदे पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यांच्या आईच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा होवो हिच देवाकडे प्रार्थना, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

Leave a Comment