कोरोना संकटात टी20 विश्वचषकाचे आयोजन अवास्तव – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाविषयी अनिश्चितता आहे. आता यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स यांनी कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात टी20 विश्वचषकाचे आयोजन हे अवास्तव असल्याचे म्हटले आहे. कारण 16 संघ ऑस्ट्रेलियात येणे शक्य नाही.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेबाबत आयसीसीला निर्णय घ्यायचा आहे. मात्र सध्या अनेक देशात कोरोनामुळे प्रवासावर बंदी आहे. एडिंग्स यांनी सांगितले की, मी तर हेच म्हणेल की हे अशक्य आहे. 16 संघाना ऑस्ट्रेलियात आणणे सोपे नाही. कारण अनेक देशात कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे.

आयसीसीने मागील आठवड्यात बोर्डाच्या बैठकीनंतर स्पर्धेचा निर्णय एक महिन्यांनी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी टी20 विश्वचषक रद्द करून आयपीएल होऊ शकते, असेही म्हटले जात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. येथे 7 हजार कोरोनाग्रस्त सापडले होते, ज्यातील 6 हजार पेक्षा अधिक जण बरे झाले आहेत.

Leave a Comment