लडाखमध्ये भारत आणि चीन सैन्यांमध्ये तणाव; एका अधिकाऱ्यासह दोन भारतीय जवान शहीद


लडाख – सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव असून हा तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांचे लष्कर आमने-सामने आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य लडाखमधील गलवान खोऱ्यात एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश असल्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची भीती आहे.

याबाबतची अधिकृत माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री दोन्ही देशांचे सैन्य गलवान खोऱ्यात आपापसात भिडले. भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान यामध्ये शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.

दरम्यान चीनच्या ग्लोबल टाइम्सने परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमारेषा ओलांडली आणि सैन्यावर हल्ला केला असा दावा केला आहे. यानंतर आपापसांत दोन्ही देशांचे सैन्य भिडल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर भारतीय अधिकाऱ्यांकडे या घटनेचा चीनने निषेध नोंदवला असून सीमेवरील परिस्थिती बिघडेल, असे काही करु नये असे म्हटले आहे.

Leave a Comment