कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव


वेलिंग्टन : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील काही देशांनी या जीवघेण्या रोगावर यशस्वीरित्या मात करत या रोगाला देशाबाहेर केले आहे. कोरोनामुक्त देशांमध्ये त्यामुळे लॉकडाऊनच्या अटींमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. पण आता याच शिथिलेचा परिणाम या देशांना भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकावा झाला आहे. या देशात कोरोनामुक्त झाल्यानंतर तब्बल 24 दिवसांनी दोन कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.

याबाबत माहिती देताना तेथील आरोग्य मंत्रालयाने दुजोरा देत म्हटले आहे की देशातील दोन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही रुग्ण नुकतेच ब्रिटनहून परत आले होते आणि दोघे एकमेकांशी संबंधित आहेत. दोघेही आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रिटनला गेले होते. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर त्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यांची वेलिंग्टनला परतल्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

विशेष म्हणजे न्यूझीलंडने 8 जून रोजी देश कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काही प्रमाणात निर्बंध हटवण्यात आले. पण आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी अद्याप कायम आहे. केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवासाची परवानगी आहे.

8 जून रोजी शेवटचा कोरोना रुग्ण निरोगी झाल्याचे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेने यांनी सांगितले होते. तसेच, जेसिंडा यांनी यावेळी देशातील लॉकडाऊन हटवण्याबाबत तसेच काही प्रमाणात सूट देण्याबाबत घोषणा देखील केली होती. पण आता देशात कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्यामुळे चिंता वाढली आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या 49 लाखांच्या आसपास आहे. पण त्यांनी पहिल्यापासूनच कडक नियम लागू केलेले आहेत.

28 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर देशात एकूण 1504 कोरोना रुग्ण सापडले. तर, 22 जणांचा मृत्यू झाला. पण देशाच्या सर्व सीमा मार्चपासून बंद करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊनच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. पण आता पुन्हा तब्बल 24 दिवसांनी कोरोनाने देशात शिरकाव केल्याने न्यूझीलंडवासियांची वाढली आहे.

Leave a Comment