…अन् तळीराम माकडालाच सुनावण्यात आली ‘जन्मठेपे’ची शिक्षा


आजवर आपण माणसाला जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याचे ऐकले किंवा वाचले असेल, पण तुम्ही एखाद्या प्राण्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे कधी ऐकले आहे का? आमच्या मते तर नक्कीच ऐकले असेल. कारण उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील प्राणीसंग्रहायलामधील एका माकडाला अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे आता त्या माकडाला त्याचे उर्वरित आयुष्य पिंजऱ्यामध्येच व्यतीत करावे लागणार आहे. या संदर्भातील वृत्त एआयएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कलुआ असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या या माकडाचे नाव असून मिर्जापूरमधील अडीचशेहून अधिक व्यक्तींवर या माकडाने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे या माकडाने केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. कलुआला तेथील एका जादूगाराने पाळले होते. दारुचे या जादूगाराला व्यसन असल्याने तो स्वतःसोबत या माकडालाही दारु पाजायचा. त्यामुळे या माकडाला देखील दारुचे व्यसन लागले. पण मध्यंतरी या माकडाचा मालक जादूगार मरण पावल्यामुळे या माकडाला दारु मिळणे बंद झाल्यामुळे ते हिंसक झाले. त्यामुळे त्याने स्थानिक नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या माकडाने उच्छाद मांडल्यानंतर स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वन अधिकारी आणि प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या माकडाला पकडले. या माकडाला अनेक प्रयत्नानंतर पकडण्यात यंत्रणांना यश आले.

या माकडाला आम्ही काही महिने एकटे ठेवले होते. त्याला आता एका स्वतंत्र पिंजऱ्यामध्ये हलवण्यात आले आहे. पण एवढ्या महिन्यानंतरही त्याच्या वागणूकीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. तो आधीप्रमाणेच हिंसकपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. हे माकड मागील तीन वर्षांपासून आमच्याकडे आहे, पण त्याच्यात तीळमात्रही फरक पडलेला नाही. एवढ्या वर्षानंतरही त्याच्यामध्ये काहीच फरक न पडल्यामुळे आम्ही त्याला कायमचे पिंजऱ्यामध्येच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे प्राणी संग्रहालयाचे प्रमुख नासिर यांनी सांगितले. हे माकड सहा वर्षांचे असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या माकडाला मोकळे सोडले तर तो पुन्हा नागरिकांवर हल्ला करु शकतो. हे माकड कोणाशीही मिळून मिसळून वागत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात.

Leave a Comment