बाजारात नरेंद्र मोदी मास्कला प्रचंड मागणी


नवी दिल्ली – कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी वाढली असून मध्ये प्रदेशातील कपडा व्यावसायिकांनी याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मास्क बाजारात आणला आहे. या मास्कला लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. मोदींच्या मास्कसोबतच मास्क खरेदी करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कमलनाथ यांचे पर्याय देखील बाजारात उपलब्ध आहेत.

यासंदर्भात माहिती देताना एका विक्रेत्याने सांगितले की, आपण आतापर्यंत असे ५०० ते १००० मास्क विकले असून या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मास्कही लोकांच्या पसंतीस पडत आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्याकडे राहुल गांधी, कमलनाथ यांच्या चेहऱ्याचे मास्कही ठेवले आहेत. पण यासर्वात जास्त मागणी मोदींच्या मास्कला असून त्याला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे देखील त्या विक्रेत्याने सांगितले आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबत मास्क वापरणेही अनिवार्य असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशचाही समावेश आहे. मध्य प्रदेशाता आतापर्यंत कोरोनाचे ११ हजार रुग्ण सापडले असून ४६५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

Leave a Comment