‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील वर्षापर्यंत पगारवाढ नाही


नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या एका आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. यासंदर्भात डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने (DoPT)जारी केलेल्या आदेशानुसार, 2019-20 साठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अॅन्युअल परफॉरमन्स अॅसेसमेंट रिपोर्ट (APAR) पूर्ण करण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढवला असून हा कालावधी मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा कालावधी यापूर्वी 31 डिसेंबर 2020 होता. सरकारने अप्रेजलची प्रक्रिया मार्च महिन्यामध्ये डिसेंबरपर्यंत वाढवली होती. त्यात आता नवीन आदेशानुसार हे स्पष्ट होत आहे, पगारवाढीसाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मार्च 2021 ची वाट पाहावी लागेल.

11 जून रोजी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, सध्याची एकूण परिस्थिती पाहता अॅन्युअल परफॉरमन्स अॅसेसमेंट रिपोर्ट प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी डिसेंबर 2020 वरून मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ग्रृप ए, बी आणि सी चे कर्मचारी या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत. सामान्यपणे 31 मार्चला पूर्ण होणारी ही प्रक्रिया आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्यात पूर्ण केली जाणार आहे.

सरकारी आदेशानुसार 31 मे 2020 पगारवाढीसाठीचा फॉर्म भरण्याची मुदत होती. पण ही प्रक्रिया लॉकडाऊनमुळे अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी हा कालावधी सरकारने वाढवला आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आता 31 जुलै पर्यंत हा फॉर्म ऑनलाइन भरू शकतील. त्याचप्रमाणे 31 ऑगस्टपर्यंत रिपोर्टिंग ऑफिसरला देखील सेल्फ-अप्रेजल जमा करता येईल. याआधी याची अंतिम तारीख 30 जून होती.

30 सप्टेंबरपर्यंत या प्रक्रियेतील रिपोर्ट समीक्षक अधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक आहे. फॉर्म्स अॅन्युअल परफॉरमन्स अॅसेसमेंट रिपोर्ट सेलकडे 15 नोव्हेंबरपर्यंत पाठवण्यात येतील. यानंतर 31 डिसेंबरपर्यंत अप्रेजल प्रक्रिया पूर्ण करायची आहे. संपूर्ण एपीएआरची प्रक्रिया 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

Leave a Comment