तुमच्या मोबाईलमधील सुशांतचे ‘ते’ फोटो तात्काळ डिलीट करा; महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचा इशारा


मुंबई – महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचा इशारा दिला आहे. रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


त्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत करिअरला सुरुवात केली होती. त्याचबरोबर त्याने २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आत्महत्येनंतर सोशल मिडियावर सुशांतच्या घरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. पण आता महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने याच फोटोंवरुन इशारा दिला आहे.


त्याचबरोबर सुशांतचे ते फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्याचबरोबर याआधी लोकांनी फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंसंदर्भातील इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी या संदर्भात तीन ट्विट केले आहेत.


महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. ज्यात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. हे फोटो धक्कादायक आणि शेअर करण्यासारखे नाहीत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशाप्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जाऊ शकते. महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये, असे आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत, असे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment