मागील 6 महिन्यात 20 टक्क्यांनी महागले सोने

मागील वर्षी 25 टक्क्यांनी वाढणारी सोन्याची किंमत यंदा 20 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक मंदी आणि कोरोना व्हायरस संकटामुळे सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील तणाव देखील यास कारणीभूत आहे. आता एमसीएक्सवर सोने 47,355 रुपये प्रति ग्रॅमच्या स्तरावर पोहचले आहे. मागील महिन्यात सोने प्रति 10 ग्रॅम 48 हजार रुपयांवर पोहचले होते.

भारतात सोन्याच्या मागणीवर लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे. सोन्याच्या किंमतीवर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी आकारले जाते.  शेअर बाजारात देखील उतार-चढाव पाहण्यास मिळत असल्याने लोक सोन्यात गुंतवणुकीस उत्साह दाखवत आहेत. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (ईटीएफ) 815 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. सोन्यातील गुंतवणूक आता सुरक्षित पर्याय वाटू लागला आहे. मागील वर्षी गोल्ड ईटीएफमध्ये एकूण 3299 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

असोसिएशन ऑफ म्युच्यूअल फंड्स इन इंडियानुसार मे महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 815 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. तर एप्रिल महिन्यात 731 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. मार्चमध्ये 195 कोटी, फेब्रुवारीमध्ये 1,483 कोटी आणि जानेवारी महिन्यात 202 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती.

Leave a Comment