‘कोरोना’ संशयित रुग्णांवर नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार होणार अंत्यसंस्कार


नवी दिल्ली – कोरोना संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यानुसार आता प्रयोगशाळेतील निकालांची गरज कुटुंबाला शव देण्याआधी लागणार नाही.


याबाबत रविवारी दिल्ली सरकारला मंत्रालयाने पत्र लिहिले की संशयित रुग्णांच्या लॅबच्या निकालाची वाट न पाहता मृतदेह कुटूंबाकडे सोपवावा, पण सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंत्यसंस्कार होतील. एका ट्विटद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही याबद्दलची माहिती दिली. त्याचबरोबर गृह मंत्रालयाकडून ट्विटद्वारे कोरोना संशयित रूग्णांचे मृतदेह कुटूंबाकडे देण्यासाठी रिपोर्टची वाट पाहू नये, अशी माहितीही देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाच्या अंत्यसंस्कारची पूर्ण खबरदारी घ्यावी असेही म्हटले आहे.


त्याचबरोबर कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (9115444155) देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून, ओपीडी नेमणुका आणि वॉलिंटिअर्सशी संपर्क साधू शकता. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिल्लीच्या एम्समध्ये एक कॉल सेंटर देखील तयार केले आहे, जेणेकरुन तेथील डॉक्टर देशभरातील इतर डॉक्टरांना उपचारासाठी सल्ला देऊ शकतील.

Leave a Comment