फेक व्हिडीओ प्रकरणी दिग्विजय सिंह गोत्यात; एफआयआर दाखल


भोपाळ – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा एक बदल केलेला कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी हा व्हायरल कथित व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला होता. तसेच तो व्हिडीओ त्यानंतर ११ जणांनी रिट्विट केला. याप्रकरणी आता कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे दिग्विजय सिंग गोत्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासह ११ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

शिवराज सिंग चौहान यांनी १२ जानेवारी २०२० रोजी विरोधीपक्षात असताना कमलनाथ सरकारच्या मद्यविषयक धोरणांवर टीका करत २ मिनिटे १९ सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच त्यानंतर काही बदल त्या व्हिडीओमध्ये करून तो ९ सेकंदांचा करुन व्हायरल करण्यात आला होता. तसाच चौहान यांचाच तो व्हिडीओ असल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवराज सिंग चौहान यांनी याप्रकरणी कारवाईचा इशारा दिला होता. तसेच हा व्हिडीओ जे लोक शेअर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून दिग्विजय सिंग यांनी शेअर केला होता.

हा व्हिडीओ रविवारी दुपारी दिग्विजय सिंग यांनी ट्विटर हँडलवरून शेअर केल्यानंतर ११ जणांनी त्यांचा हा व्हिडीओ रिट्विटही केला होता. प्रकरण वाढल्यांतर त्यांनी हा व्हिडीओ डिलीटही केला. परंतु आता भाजपने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने दिग्विजय सिंग यांच्यासोबतच व्हिडीओ रिट्विट करणाऱ्यांवरही एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

Leave a Comment