हॉस्पिटलने कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तीकडून आकारले 8 कोटींचे बिल

अमेरिकेतील कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात करणाऱ्या एका 70 वर्षीय व्यक्तीला हॉस्पिटलने तब्बल 1.1 मिलियन डॉलरचे (जवळपास 8.37 कोटी रुपये) बिल सोपवले आहे. मायकल फ्लोर हे कोरोनामुळे अगदी मृत्यूच्या दारात पोहचले होते. 4 मार्चला त्यांना नॉर्थवेस्टर्न सिटीमधील एका हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तेथे तब्बल 62 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकवेळ अशी आली की नर्सने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि मुलांना देखील फोन केला होता. मात्र कोरोनावर मात करत त्यांना 5 मे ला हॉस्पिटलमधून सोडणार होते. यावेळी त्यांना 181 पानांचे तब्बल 8 कोटींचे बिल सोपवण्यात आले.

यामध्ये प्रत्येक दिवसाचे इंटेसिव्ह केअर रुमचे 9,736 डॉलर, 42 दिवस स्टेर्ली रुममध्ये राहण्याचे 4,09,000 डॉलर, 29 दिवस व्हेंटिलेटरवर राहण्याचे 82,000 डॉलर आणि  2 दिवस मरणावस्थेत पोहचले असताना केलेल्या उपचारांचे 1 लाख डॉलर आकारण्यात आले आहे.

मात्र फ्लोर यांच्याकडे सरकारी विमा असल्याने त्यांना बिलाची रक्कम स्वतःच्या खिश्यातून भरण्याची गरज पडली नाही. ते म्हणाले की, माझे प्राण वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च झाले. हे पैसे नक्कीच योग्यरित्या वापरले आहेत. मात्र मला हे देखील माहिती आहे की असे म्हणणारा मी एकटाच असेल.

Leave a Comment