देशात कोरोनाचा कहर कायम; मागील २४ तासांत ११,५०२ नव्या रुग्णांची नोंद


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण आता सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिल देत देश हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. पण देशावर ओढावलेले संकट अद्याप कमी झालेले नाही.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ११ हजार ५०२ नवीन रुग्ण आढळले असून ३२५ जणांनी आपला जीव गमावला आहे. देशात सलग पाचव्या दिवशी तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही वाढू लागला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख ३२ हजार ४२४ एवढी झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या देशात अधिक आहे. आतापर्यंत एक लाख ६९ हजार ७९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक लाख ५३ हजार १०६ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत ९ हजार ५२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

लॉकडाउननंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढायला लागली आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देशातील काही भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावाही केला जात आहे. सरकारने ही बाब स्वीकारली, तर लोक अधिक सावध होतील व काळजी घेतील, अशी सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.

Leave a Comment