स्पर्श न करता वाजणारी घंटा

फोटो साभार झूम न्यूज

करोनाचे संकट, त्यापासून बचाव होण्यासाठी सोशल डीस्टन्सिंग, कोणत्याही बाहेरच्या वस्तूंना स्पर्श न करणे या सारखे अनेक उपाय पाळणे नागरिकांना भाग पडले आहे. अनलॉक वन मध्ये ८ जून पासून अनेक राज्यात धार्मिक स्थळे खुली केली गेली असली तरी तेथेही हे नियम पाळणे बंधनकारक आहेच. मंदिरात जाऊन घंटा वाजवायची नाही हे थोडे विचित्रच. त्यावर स्पर्श न करता वाजणारी घंटा मध्यप्रदेशात पशुपती नाथ मंदिरात बसविली गेली आहे. विशेष म्हणजे ही घंटा एका मुस्लीम बांधवाने बनविली आहे.

मध्यप्रदेशच्या मंद्सोर येथे राहणारे नाहरू खान युट्युब वर पाहून अनेक अजब गजब वस्तू बनविण्यात माहीर आहेत. त्यांनी करोना काळात बनविलेल्या आटोमेटेड सॅनीटायझर मशीनचे खूप कौतुक झाले आहे. आता पुन्हा ते सेन्सर बसविलेली घंटा घेऊन आले आहेत. ते सांगतात, अनलॉक वन मध्ये धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु झाली. मशिदीची अजान ऐकू येऊ लागली. पण मंदिरात घंटा स्पर्श होऊ नये म्हणून झाकून ठेवल्या गेल्या आहेत. अजान प्रमाणे मंदिरातील घंटेचा नाद ही ऐकू यावा यासाठी त्यांनी ही घंटा तयार केली.

या घंटेमध्ये सेन्सर बसविला गेला असून हात फक्त जवळ नेला तरी घंटा वाजते. ही घंटा पशुपती मंदिरात बसविली गेली आहे. सोशल मीडियावर त्या शोधाचे खूप कौतुक केले जात आहे. शिवाय यामुळे सेन्सर असलेली घंटा बसविणारे पशुपती मंदिर हे देशातील पहिले मंदिर बनले आहे.

Leave a Comment