भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूड- पाणीपुरी 

फोटो साभार टूर गाईड

कोविड १९ मुळे लागू झालेला लॉक डाऊन मागे घेतला गेल्यानंतर विविध शहरातील बाजार पुन्हा गजबजू लागल्याचे दिसून येत आहे. मात्र अजुनी चाट, भेळ, पाणीपुरी विकणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर लागत नाहीत. एका सर्व्हेक्षणातून असे दिसून आले की लॉक डाऊनच्या काळात खवय्यांनी सर्वाधिक काय मिस केले असेल तर पाणीपुरी. देशभर हा प्रकार मिळतो आणि विविध नावांनी ओळखला जातो. दिल्ली भागात गोलगप्पे, उत्तर प्रदेशात पाणी बत्तासा, कोलकाता मध्ये फुचको नावाने विकली जाणारी ही पाणीपुरी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांची आवडती आहे.

फोटो साभार बीबीसी

द. हिंदू मधील बातमीनुसार लॉक डाऊन काळात गुगलवर पाणी पुरी बनविण्याची कृती सर्वाधिक सर्च केली गेली. या सर्च मध्ये या काळात १०७ टक्के वाढ दिसून आली. काही सोशल मिडियानी पाणीपुरीचे गुणगान मोठ्या प्रमाणावर केले. अनेक घरातून पाणीपुरी बनविली गेली पण अस्सल खवय्ये मानतात की पाणीपुरीची खरी मजा ती ठेल्यावर खाण्यातच आहे.

बटाटा, रगडा, गोड चटणी, तिखट स्वादिष्ट पाणी यांनी सजलेल्या या पाणीपुरीच्या चवीचे शब्दात वर्णन करता येणे अशक्य आहे कारण ती खाऊन अनुभवण्याची गोष्ट आहे. पाणीपुरी आली कुठून याच्या अनेक कथा सांगतात. काहीच्या मते उत्तर भारतात १७ व्या शतकात मुगल सम्राट शहाजहान याने दिल्लीला राजधानी केली. यमुनेचे पाणी खारट असल्याने लोकांना पाण्याचा त्रास होऊ लागला तेव्हा हकीमाने तळलेले, मसालेदार उपहार पदार्थ खाण्याचा सल्ला दिला. त्याबरोबर दही खावे असेही सुचविले. त्यातून सुरु झालेल्या प्रयोगातून पाणी पुरी जन्माला आली.

फोटो साभार पिंटरेस्ट

दिल्ली मधून कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या कामगार वर्गाच्या माध्यमातून ती देशाच्या अन्य भागात पोहोचली आणि आता सगळ्या देशाची आवडती बनली. हा पदार्थ काटे, सूरया, चमचे वापरून खाता येत नाही तर तो हातानेच अलगद उचलून तोंडात टाकावा लागतो हे त्याचे आणखी एक विशेष.

याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की आता नामवंत हॉटेल्स मधून सुद्धा ती सर्व्ह केली जाते.

Leave a Comment