पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी वाहिली सुशांत सिंह राजपुतला श्रद्धांजली


मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत माहिती पोलिसांना त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने दिल्याचे सांगितले जात आहे. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. ‘काइ पो चे’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.

भारतीय संघाचा कॅप्टन कुल अर्थात महेंद्र सिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये सुशांतने धोनीची व्यक्तिरेखा साकारली होती. यासाठी त्याने धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला होता. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. रविवारी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यानाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.


पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये सुशांत सिंह राजपूत… एका अतिशय प्रतिभावान, उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला. टिव्ही मालिका आणि चित्रपटांतील त्याचा अभिनय खूप चांगला होता. मनोरंजन जगतात त्याने स्वत:च्या परिश्रमाने नाव मिळवले. तो खूप जणांसाठी प्रेरणास्थान होता. तो अनेक आठवणी मागे ठेऊन गेला आहे. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती.., असे म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांनी सुशांत निधनानिमित्त ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात, अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या अचानक निधनाची बातमी धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना बळ देवो.

Leave a Comment