ब्राझीलमध्ये भयावह परिस्थिती! मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही


साओ पाउलो : जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असून या जीवघेण्या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यानंतर अमेरिका मृतांच्या आकडेवारीत पहिल्या स्थानी आहे तर दुसऱ्यास्थानी ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये सध्या एवढी भयावह परिस्थिती आहे की, तेथे मृतदेह दफन करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यातच तेथील राष्ट्रपती राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी साधा ताप जरी आला तरी त्याची तुलना त्यांनी कोरोनासोबत केली होती. आता याच कोरोनामुळे ब्राझीलमधील 42 हजार 270 लोकांनी आपला जीव गमावला आहे. ब्राझीलमध्ये सध्या 8 लाख 50 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

याबाबत माहिती देताना साओ पाउलो येथील पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन मृतदेह दफन करण्यासाठी येथे जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आता 3 वर्षांपूर्वी दफन करण्यात आलेल्या मृतदेहांचे अवशेष बाहेर काढले जात आहेत. या जागी पुन्हा खोदून नव्याने मृतदेह दफन केले जात आहेत. जून्या मृतदेहांचे अवशेष एका प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्यात येत आहेत.

यासंदर्भात फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार एप्रिलमध्ये 1654 लोकांना विला फॉर्मोसा कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात आले होते. ही संख्या मार्चपेक्षा जास्त होती. देशातील मृतांचा आकडा मे आणि जूनमध्ये आणखी वाढला, पण ही आकडेवारी लपवण्यात आली. तज्ज्ञांच्या मते ब्राझीलमधील दिलेला मृतांचा आकडा खोटा आहे.

मृतदेहांना विला फॉर्मोसामध्ये दफन करणारे एडनील्सन कोस्टा यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात काम खूप वाढले आहे. देशाची परिस्थिती खूप वाईट आहे. दिवस-रात्र मृतदेह दफन करण्याचे काम करावे लागते. पण अद्यापही लोक या रोगाकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत.

Leave a Comment