‘शिवगामी देवी’च्या गाडीतून जप्त केल्या दारुच्या बाटल्या


‘बाहुबली’ या चित्रपटात साकारलेल्या शिवगामी देवी या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रम्या कृष्णन ही आता अडचणीत सापडली आहे. कारण चेन्नई पोलिसांनी लॉकडाऊन काळात तिच्या गाडीतून तब्बल १०४ दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून पोलिसांनी यानंतर रम्याला ताब्यात घेतले होते.

यासंदर्भात यूएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ममलापुरमहून अभिनेत्री रम्या कृष्णन ही चेन्नईला जात होती. यावेळी तिच्यासोबत तिची बहीण विनया कृष्णन ही देखील गाडीत होती. दरम्यान, चेन्नईजवळ एका चेक पोस्टवर जेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी तपासली त्यावेळी तिच्या गाडीतून ९६ बाटल्या बिअर आणि ८ वाइनच्या बाटल्या जप्त सापडल्या. ही सगळी दारु जप्त करुन सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. रम्या कृष्णनचा ड्रायव्हर सेल्वा कुमारला पोलिसांनी कनाथूर पोलिस ठाण्यात नेले होते. पण दोघांनाही या प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्याच्यावर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रम्या कृष्णन यांची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार गुरुवारी मुथुकडू चेक पोस्टवर थांबली. त्यावेळी आम्हाला त्यांच्या गाडीत दोन क्रेट बिअर आणि आठ वाइनच्या बाटल्या सापडल्या. कोरोना व्हायरसमुळे तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी दारुची दुकाने बंद आहेत, म्हणून लोक पद्दुचेरीला जाऊन दारु खरेदी करत आहेत. दरम्यान, या विषयावर रम्या कृष्णन हिने अद्याप मौन बाळगले आहे. पण या घटनेमुळे तिचे चाहते हे तिच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. तर काही जणांनी मात्र तिला पाठिंबा देखील दिला आहे.

Leave a Comment