अझीम प्रेमजींनी दिलेला शब्द खरा केला; पुण्यात उभारले ‘कोरोना हेल्थ सेंटर’


पुणे : जगातील दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी दिलेला शब्द खरा करत पुण्यातील हिंजवडी परिसरात देशातील पहिले कोरोना हॉस्पिटल उभारले आहे. अझीम प्रेमजी यांचा कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदत करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी हॉस्पिटल उभारणार असा शब्द दिला होता.


त्यानुसार पुण्यातील हिंजवडी भागात असलेल्या विप्रो कंपनीच्या इमारतमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. मागील गुरूवारी या कोरोना हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. हे हॉस्पिटल 1.8 लाख वर्गफूट जागेत नावारुपाला आले आहे. 450 अद्ययावत बेड्स असून 18 व्हेंटिलेटर आणि आयसीयू विभाग आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अझीम प्रेमजी यांनी केलेल्या वचनपूर्तीचे कौतुक केले आहे. पुण्यात उभारण्यात आलेले कोरोना हॉस्पिटल हे कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विप्रोतर्फे दोन सुसज्ज अॅम्ब्युलस पुरवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले आहे. अझीम प्रेमजी आणि त्यांचे चिरंजीव रिशद प्रेमजी यांचे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारशी गेल्या 5 मे रोजी विप्रोने सामंजस्य करार केला होता. पुण्यात दीड महिन्यात कोरोना हॉस्पिटल उभारणार असा शब्द त्यावेळी अझीम प्रेमजी यांनी दिला होता.

Leave a Comment