१० लाख ४८ हजार मजुरांच्या खात्यात पैसे जमा करणार योगी आदित्यनाथ


लखनौ – हातावर पोट असलेल्या मजूरांना देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटाका बसला असून सध्या या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा मजुरांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एक हजार रुपये राज्यातील प्रत्येक मजुराच्या खात्यात जमा केले जाणार आहे. याचा लाभ राज्यातील १० लाख ४८ हजार ६६६ मजुरांना मिळणार असून राज्य सरकारला यासाठी १०४ कोटी खर्च करावे लागणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

स्थलांतरित मजुरांच्या खात्यात यापूर्वी ६११ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान लॉकडाउनमध्ये राज्यातील ३५ लाख स्थलांतरितांना योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या घरी पोहोचवल्याची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून दिवसाला १२ ते १५ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटात राज्यातील महसूल विभाग आणि मदत कार्यालयाच्या आयुक्तांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून माझ्यामते हे जगातील सर्वात मोठे मदतकार्य होते. त्याचबरोबर ३५ लाख स्थलांतरित मजुर आणि कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्यात आल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशात सर्वात जास्त स्थलांतरित मजूर परतले आहेत. १६५० श्रमिक ट्रेन्सची सोय स्थलातरितांना घरी आणण्यासाठी करण्यात आली. तर दुसरीकडे या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी १२ हजार राज्य रस्ते वाहतुकीच्या बसेस आणि इतर खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर झालेल्या सुनावणीचा योगी आदित्यनाथ यांनी यावेळी उल्लेख करत एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर परतलेल्या आपल्या राज्यावर कोणतेही भाष्य केले नसून एका अर्थी कौतुकच केल्याचे सांगितले. तर इतर राज्यांना सुनावल्याचे सांगत टोला मारण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment