व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी


लखनौ – उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅपवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकारी निवासस्थान बॉम्बस्फोट करुन उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून योगी आदित्यनाथ यांच्या घराभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. योगी यांच्या घराबरोबरच इतर पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी पोलिसांना आलेल्या या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. हा मेसेज शुक्रवारी संध्याकाळी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबरोबर ५० ठिकाणांची सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान लखनौमध्ये असून तेथील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे. हा धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर बॉम्ब स्कॉड आणि श्वान पथकांच्या मदतीने या संपूर्ण परिसराची पहाणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही महत्वाच्या व्यक्तींची घरेही या परिसरामध्ये आहेत. या प्रकरणातील दोषी व्यक्तीचा पकडण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. गौतमपल्ली पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Leave a Comment