भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन


मुंबई – आज भारतातील सर्वात वयस्कर प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. पहाटे 2.20 वाजता त्यांनी वाळकेश्वर येथील घरी अखेरचा श्वास घेतल्याची अशी माहिती त्यांचा जावई सुदर्शन नानावटी यांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांनी मुंबईच्या राहत्या घरी झोपेतच असताना अखेरचा श्वास घेतला. 1940 मध्ये त्यांनी 9 प्रथम श्रेणी सामन्यांत 277 धावा केल्या आणि 68 ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. मुंबई जिमखान्यावर (त्यावेळेचा बॉम्बे जिमखाना) जेव्हा भारतीय संघाने पहिला कसोटी सामना खेळला, तेव्हा रायजी अवघ्या 13 वर्षांचे होते. ते भारतीय क्रिकेटच्या प्रवासाचे साक्षीदारही होते

क्रिकेट क्लब ऑफ इंडियासाठी 1939 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नागपूर येथे सेंट्रल प्रोव्हिन्सेस संघाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्यांना पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावात एकच धावा करून माघारी परतावे लागल्यानंतर क्रिकेटचा त्यांनी गांभीर्याने विचार केला. मुंबई आणि बदोडा संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर त्यांनी लाला अमरनाथ, विजय मर्चंट, सी के नायडू आणि विजय हजारे यांच्यासारख्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रुमही शेअर केले होते. नुकताच त्यांचा 100वा वाढदिवस सचिन तेंडुलकर आणि स्टीव वॉ यांनी साजरा केला होता.

Leave a Comment