लॉकडाऊनच्या दिशेने ‘या’ राज्याची पुन्हा वाटचाल; राज्याच्या सीमाही होणार सील


अमृत्तसर : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच केंद्राच्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देशातील अनेक राज्य अनलॉकच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे पंजाब हे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, आता शनिवार व रविवार आणि कोणत्याही सुट्टीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन पंजाब सरकारने जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी ज्यामध्ये दिली जाणार नाही. म्हणजेच, पंजाबमध्ये शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

त्याचबरोबर पंजाब सरकारने राज्याच्या सीमा पुन्हा एकदा सील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये आंतरराज्यीय बससेवा बंद करण्यात येईल. तसेच आता १४ दिवस फ्लाइट, ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन व्हावे, लागणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्तकरून ट्रॅव्हल हिस्ट्रीतूनच समोर आली आहे. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग सर्व प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी सामना करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचेही संकेत दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध विभाग अधिकारी आणि मंत्र्यांच्या गट समितीसोबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनावर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत कठोर निर्णय घेण्यासाठी या बैठकीत तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला होता.

दिल्लीत सतत वाढणार्‍या कोरोना रुग्णांचा परिणाम पंजाबमध्येही होऊ शकतो, असे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना वाटते. कारण, दिल्लीतून पंजाबकडे दररोज सरासरी ५०० ते ८०० वाहने येत आहेत. पंजाब सरकार अशा परिस्थितीत विचार करीत आहे की, दिल्ली आणि इतर राज्यातून पंजाबमध्ये येणाऱ्या लोकांसाठी कोरोनाची चाचणी अनिवार्य करावी. पण, याबाबत पंजाब पोलीस, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment