बूम बूम आफ्रिदीला कोरोनाची लागण


नवी दिल्ली: कोरोना या जीवघेण्या व्हायरसने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. दरम्यान आफ्रिदीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून यासंर्दभातील माहितीला स्वतः आफ्रिदीने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दुजोरा दिला आहे. दरम्यान शाहिद आफ्रिदीने आपल्या फाऊंडेशनच्या सहाय्याने कोरोनाशी लढण्यासाठी अनेक नागरिकांना आतापर्यंत मदत केली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कोरोनाची लागण झाल्याचे शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला गुरुवारपासून बरे वाटत नाही. माझे अंग खूपच दुखत आहे. माझी कोरोना टेस्ट करण्यात आली आणि दुर्दैवाने कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लवकरच बरा होण्यासाठी प्रार्थनांची आवश्यकता आहे.

४० वर्षीय शाहिद आफ्रिदीचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह येणारा दुसरा पाकिस्तानचा क्रिकेटर आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी ओपनर तौफिक उमर याला देखील कोरोनाची लागण झाली होती. एक चांगली बातमी म्हणजे तौफिक उमर हा उपचारानंतर बरा होऊन घरी परतला.

आफ्रिदी मागील काही काळापासून ट्विटवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत होता. त्याने मागील काही दिवसांमध्ये कधी काश्मीर प्रश्नावरुन तर कधी कोरोनासंदर्भात मोदींवर टीका केल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाचे एक लाख 32 हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

Leave a Comment