गरजू आणि गरीब लोकांसाठी आता शेती करणार टर्बोनेटर

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंहने आपण जालंधरमध्ये जमीन विकत घेणार असल्याचे म्हटले आहे. यामागची खास गोष्ट म्हणजे या जमिनीवर केवळ गरीब आणि गरजू लोकांसाठी धान्य पिकवणार असल्याचे त्याने सांगितले. कोरोना व्हायरस संकटामुळे लोकांना मदतीची गरज असल्याचे त्याला जाणवले.

आज तकच्या कार्यक्रमात बोलताना हरभजन म्हणाला की, मला कोव्हिड-19 महामारीचे आभार मानायाचे आहेत कारण यामुळे मला जाणीव झाली की मी इतरांना मदत करू शकतो. माझ्यातील माणुसकी देखील जागी झाली. त्यामुळे मी शेतजमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे व त्यावर समाजातील गरीबांसाठी धान्य पिकवेल.

त्याने सांगितले की, हे धान्य मंदिरात व गरजू लोकांना दिले जाईल. जेणेकरून मला पैसे कमवण्यापेक्षा याद्वारे अधिक समाधान मिळेल. पुढे जाण्यासाठी एकमेंकाची मदत करणे गरजेचे आहे. मी एक गोष्ट शिकलो की सामान्य राहणे आणि कुटुंबाकडून प्रेम मिळवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

हरभजनसोबत या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुरेश रैना देखील सहभागी झाला होता. लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना दुखापतीमधून बाहेर पडण्यास आणि सराव करण्यास मदत मिळाली, असे त्याने सांगितले.

Leave a Comment