आता गाढवांची विक्री करुन पैसे कमावणार पाकिस्तान


इस्लामाबाद – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्याला पाकिस्तान देखील अपवाद नाही. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील डबघाईला आहे. त्यातच पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हफिज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० मध्ये देशातील गाढवांच्या संख्येत १ लाखांची वाढ झाली असून पाकिस्तानातील गाढवांची एकूण संख्या या वाढीनंतर ५५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

दरम्यान पाकिस्तान आणि चीन यांच्यात गाढवांसदर्भात एक करार करण्यात आला असून पाकिस्तान या करारानुसार दरवर्षी ८० हजार गाढवांची रवानगी चीनला करतो. मांसासाठी तसेच अन्य बाबींसाठी चीनमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर चीनमध्ये गाढवांच्या कातडीचाही उपयोग करण्यात येतो. त्यांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटिनपासून विविध प्रकारची औषधेही तयार केली जातात.

पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात चीनच्या काही कंपन्यांनी लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गाढवांची संख्या अधिक असलेला पाकिस्तान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तेथील गाढवांचे दर त्यांच्या प्रकारानुसार निश्चित केले जातात. काही अहवालांनुसार, १५ ते २० हजार रूपये पाकिस्तानात एका गाढवाच्या कातडीसाठी आकारले जातात. याची विक्री करून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानात गाढवांच्या उपचारांसाठी विशेष रुग्णालयेदेखील आहेत.

Leave a Comment