मुंबईकरांना एका कॉलवर मिळणार स्मशानभूमीतील सद्यस्थितीची माहिती


मुंबई – बृह्नमुंबई महानगरपालिकेने स्मशानभूमींची सद्यस्थिती तात्काळ मुंबईकरांना मिळावी यासाठी संगणकीय ‘डॅश बोर्ड’ तयार केले आहे. सध्या अंतिम टप्प्यात याचे काम असून हे ‘डॅश बोर्ड’ या महिन्याच्या अखेरीपर्यंत कार्यान्वित होणार आहे. हा ‘डॅश बोर्ड’ १९१६ या नागरी सेवा सुविधाविषयक दूरध्वनी क्रमांकाशी जोडण्यात आला आहे. या क्रमांकावरून स्मशानभूमीतील सद्यस्थिती सगळी माहिती ऑनलाईन मिळणार आहे. या डॅश बोर्डच्या माध्यमातून कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरू असून, पुढील अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाइन घेता येणार आहे.

प्रत्येक स्मशानभूमीवर बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहांची आकडेवारी या डॅश बोर्डद्वारे ‘अपडेट’ केली जाणार आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यापूर्वी संबंधित नातेवाईकांना स्मशानभूमीची सद्यस्थिती या डॅशबोर्डच्या मदतीने दूरध्वनीद्वारे कळणार आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर विद्युत वा गॅस दाहिनी ही यंत्रणा काही कालावधीसाठी बंद ठेवली जाते. तर कधी देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी बंद ठेवावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेता २४ तासात एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. या प्रकारची १८ विद्युत वा गॅस दाहिन्या पालिका क्षेत्रात असून, त्यात २४ तासांत १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात.

त्याचबरोबर मुंबईत २१९ ठिकाणी पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था आहे. या प्रत्येक ठिकाणची कमाल क्षमता २४ तासांत सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. २१९ स्मशानभूमींची एकत्रित क्षमता ही २४ तासांत एक हजार ३१४ मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे. स्मशानभूमींवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताण येत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वस्तूस्थिती कळावी यासाठी ही माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment