पाकिस्तानातील जुगारी गाढवाला मिळाला जामीन


इस्लामाबाद – जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका गाढवाला पाकिस्तानातील एका न्यायालयाने जामीन दिल्याची घटना घडली आहे. चार दिवस आरोपी गाढवाला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्यानंतर गाढवाला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोडून देण्यात आले. शनिवारी पोलिसांनी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिम यार खान प्रांतात या गाढवाला अटक केली होती.

दरम्यान एका दिवसानंतरच जुगार खेळण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांना सोडण्यात आले होते. पण पोलिसांनी गाढवाला मात्र चार दिवस पोलीस स्थानकाबाहेर बांधून ठेवले होते. हे गाढव ४० सेकंदात ६०० मीटर धावू शकते की नाही यावर लोकांनी सट्टा लावला होता. त्यानंतर पोलिसांनी गाढवासह सर्वांना अटक केली होती. जगभरात गाढवाला करण्यात आलेल्या अटकेची चर्चा सुरु होती. त्याचबरोबर यासंदर्भात पोलिसांशी अनेक माध्यमांनीही संवाद साधला. तसेच सोशल मीडियावरही याची चर्चा सुरू होती.

यादरम्यान केवळ ४ दिवस गाढवाला बांधून ठेवण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. यात न्यायालयाने हस्तक्षेप करत गाढवाचे मालक गुलाम मुस्तफा यांना गाढव परत करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत गाढवाला सुरक्षित ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते. एफआयआरमध्ये अन्य लोकांसह या गाढवाचे नावही नमूद करण्यात आल्यामुळेच या गाढवाला पोलीस ठाण्याबाहेर बांधून ठेवण्यात आल्याची माहिती रहिम यार खान प्रांताचे एसएचओंनी दिली. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी १ लाख २० रूपयांची रक्कम जप्त केली होती.

Leave a Comment