कोरोनाच्या संकटाची जगाला कल्पना देणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरच्या पत्नीने दिला सुंदर बाळाला जन्म


वुहान – कोरोना व्हायरसच्या संकटाची जगाला सर्वप्रथम कल्पना देणाऱ्या वुहानमधील डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने सुंदर बाळाला जन्म दिला आहे. कोरोना व्हायरसचे सत्य ली वेनलियांग यांनी जगासमोर आणले. पण त्यांचा आवाज दडपून टाकण्याचा चीनमधल्या यंत्रणांनी प्रयत्न केला. फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसमुळे ली वेनलियांग यांचा मृत्यू झाला.

आता एका गोंडस बाळाला त्यांच्या पत्नी फू शुजेई यांनी जन्म दिला आहे. हे त्यांचे दुसरे अपत्य आहे. वीचॅट या इन्स्टंट मेसेंजिग अ‍ॅपवर फू शुजेई यांनी आपल्या मुलाचा गोंडस फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्या फोटोखाली दिवंगत नवऱ्याकडून मिळालेली ही ‘अखेरची भेट’ अशा ओळी लिहिल्या आहेत.

वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ली वेनलियांग नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते. ली यांना चीनमध्ये अफवा परसरवत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ते वारंवार कोरोनाच्या देशातील खऱ्या परिस्थितीबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न करत होते. हा आजार अत्यंत अल्पकाळात जागतिक महामारी बनला. ली यांनी ३० डिसेंबर रोजी त्यांच्या सात मित्रांच्या वी चॅट ग्रुपवर सर्वप्रथम कोरोना व्हायरसच्या आजाराची माहिती दिली होती. सार्स सारखा हा आजार वाटत असल्याचे त्यांनी म्हटले होते. चीनमध्ये कोरोनासारखीच सार्सची साथ २००२-०३ साली आली होती. शेकडो नागरिकांचा त्यात मृत्यू झाला होता. फक्त मित्रांना या आजाराबद्दल सतर्क करण्याचा आपला हेतू होता, असे ली यांनी सांगितले. पण ती माहिती एका पोस्टनंतर व्हायरल झाली.

ली यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात जाऊन काम सुरु केले. पण एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे तिथे त्यांना कोरोनाची लागण झाली. ली यांना १२ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने ढासळण्यास सुरुवात झाली. अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आणि अखेर त्यांचा फेब्रुवारीमध्ये मृत्यू झाला.

Leave a Comment