शीतपेयांवर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात कोका कोला आणि थम्स-अप सारख्या शीतपेयांवर बंदी घालण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीलाच 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सर्वोच्च न्यायालयात कोका कोला आणि थम्सअपच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी उम्मेदसिंह पी चावडा नावाच्या एका व्यक्तीने याचिका दाखल केली होती. आरोग्यासाठी हे दोन शीतपेय घातक असल्याने त्यावर बंदी घालावी आणि केंद्राला अधिसूचना जारी करण्याचे निर्देश द्यावे, असे त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. दरम्यान यावर सुनावणी करताना न्या. डी वाय चंद्रचूड, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला एका महिन्याच्या आत पाच लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे.

याचिकाकर्त्याने कायद्याच्या प्रक्रियेचा दुरूपयोग केल्याचे न्यायालयाने म्हटले असून कोणतीही ठोस तांत्रिक माहिती या विषयावर नसताना ही याचिका दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, याचिकाकर्ता कोका-कोला आणि थम्स-अप आरोग्यासाठी घातक असल्याच्या दाव्याला बळकटी देण्यास असमर्थ आहे. शिवाय याच दोन ब्रँडवर का बंदी घालावी याबाबतही त्यांच्याकडे स्पष्टीकरण नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

Leave a Comment