‘या’ देशाने केली कोरोना प्रतिबंधक पहिल्या औषधाची अधिकृत घोषणा


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप कायम असून अद्याप कोणत्याही देशाला या रोगाचे समूळ नायनाट करणारे औषध सापडलेले नाही. त्यातच आता रशियाकडून कोरोना प्रतिबंधक एका औषधाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली असून हे औषध रशियातील विविध भागात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याची घोषणा अद्याप कोणत्याही देशाकडून करण्यात आलेली नाही. पण रशियाकडून कोरोनावरील उपचारासाठी एविफेविर या अ‍ॅण्टी व्हायरल औषधाच्या वापराला सुरुवात झाली आहे. देशातील जवळपास सर्व भागात या औषधाचा पुरवठा करण्यासंबंधी करार करण्यात आला आहे. रशियामधील RDFI या मंडळाने या औषधाविषयी माहिती दिली आहे. तसेच 4 दिवसांमध्ये एविफेविर औषधाचा वापर करणारे काही रुग्ण बरे झाल्याचा दावाही या मंडळाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिले आहे.

जगभरातील बहुतांश देश कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे हतबल झाले आहेत. लॉकडाऊन आणि इतर काही उपाययोजनांनंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्यामुळे बहुतांश देशांनी रोगासमोर गुडघे टेकल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. त्यातच आता रशियात या अ‍ॅण्टी व्हायरल औषधाचा वापर सुरू झाल्यानंतर जगभरातील तब्बल 10 देशांनी रशियाकडे या औषधाची मागणी केली आहे.

दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लसींचे संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी आणि बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी अनेक कंपन्यांनी कंबर कसली असून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीने आशेचा किरण दाखवला आहे. कोरोनाला अटकाव करणारी लस तयार असून पुढील महिन्यात मानवांवर त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment