‘पुलं’चे हस्ताक्षर आता झाले डिजिटल, पुण्यातील कंपनीने तयार केला खास फाँट

संपुर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांचे हस्ताक्षर आता डिजिटल फाँटमध्ये पाहण्यास मिळणार आहे. पुण्यातील डिजिटल एजेंसी बी बिरबलने हा डिजिटल फाँट तयार केला आहे. त्यांनी सांगितले की, मराठी वाचकांमध्ये पु. ल. कायमस्वरूपी राहावेत यासाठी हे करण्यात आले आहे. एजेंसी 12 जूनला पु. ल. देशपांडेच्या स्मृतीदिना निमित्ताने हा फाँट लाँच करणार आहे.

या फाँटचे नाव ‘पुल100’ असे आहे व सर्वांसाठी मोफत उपलब्ध असेल. एजेंसीचे संस्थापक आणि संचालक गंगाधर संगोराम म्हणाले की, महान लेखकाला त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे हस्ताक्षर डिजिटल माध्यमात उपलब्ध करून आदरांजली वाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील दीड वर्षांच्या मेहनतीचे हे फळ असून, हे वास्तवात उतरलेले पाहून आनंद होत आहे.

पुलंच्या हस्ताक्षरातील पत्रे जमा करून हा फाँट डेव्हलप करण्याची सुरूवात झाली. यासाठी खास हस्ताक्षरतज्ञाची देखील मदत घेतली. संगोराम यांनी सांगितले की, पुलंचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या हस्ताक्षराचे डिजिटल फाँट तयार करणे हे मोठ्या जबाबदारीचे काम होते. मुख्य आव्हान त्यांच्या हस्तक्षरातील सार फाँटमध्ये उतरवणे हे होते. एका महान व्यक्तीचे हस्ताक्षर डिजिटल स्वरूपात आणणे ही आमची आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे.

Leave a Comment