आज संध्याकाळी पाच वाजता मनसेचे #MNSHornOKPlease आंदोलन


मुंबई – देशासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनचा आर्थिक फटका वाहतूक व्यवसाय आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित वर्गाला बसला असून त्यांचा आवाज आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आज राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हॉर्न ओके प्लिज आंदोलनाची हाक दिली आहे.

बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश जावा आणि झोपेचे सोंग घेतलेले राज्य सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी आज संध्याकाळी ठीक ५ वाजता सर्वांनी फक्त एक मिनिट हॉर्न वाजवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी केले आहे. #MNSHornOKPlease हा हॅशटॅग ट्विटरवर वापरुन या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसेमार्फत करण्यात आले आहे.


जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनामध्ये सहभागी करुन घेण्यासंदर्भातील मेसेज व्हायरल केले जात आहे. ‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन हे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेना आणि आपली स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारं आंदोलन आहे. आपण आज आणि उद्याची दिवस-रात्र एक करा. आपल्या विभागातील मनसेच्या सर्व महिला पुरुष, पदाधिकाऱ्यांना व महाराष्ट्र सैनिकांना तसंच वाहनचालक – मालकांना भेटा. आंदोलनाबाबत त्यांना सविस्तर माहिती द्या. त्या सर्वांना आपल्याआपल्या विभागात असतील त्या ठिकाणी फक्त एक मिनिट हॉर्न वाजविण्याची विनंती करा, असे व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.

त्याचप्रमाणे हॉर्न वाजवण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मनसे पदाधिकाऱ्याने त्या ठिकाणावरून स्वतः व इतरांनाही फेसबुक लाईव्ह करायला सांगा, असेही मनसे वाहतूक सेनेमार्फत सांगण्यात आले आहे. सोशल माडियावर या आंदोलनासंदर्भात पोस्ट करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि हा हॅशटॅग व्हायरल करण्याचे आवाहन देखील मनसे वाहतूक सेनेने कार्यकर्त्यांना केले आहे.

Leave a Comment