मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण - Majha Paper

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण


मुंबई – यंदा आषाढी एकादशीला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा भरणार नाही. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने ई-मेलद्वारे त्याविषयीचे रितसर निमंत्रण पाठवल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

आषाढ एकादशी सोहळा आषाढ शुध्द देवशयनी एकादशी दिवशी म्हणजेच १ जुलै २०२० रोजी होणार आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची देवतांची शासकीय महापुजा मुख्यमंत्री व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते आषाढ शुध्द देवशयनी एकादशी दिवशी पहाटे २.२० वाजता केली जाते.

गेल्या 350 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच कोरोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नाही. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी कोणीही वारकरी भाविकाने पंढरपूरला येऊ नये, अशा प्रकारचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमुख संतांच्या पादुका मात्र पंढरपूर येथे आणल्या जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर एक जुलै रोजी आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

आषाढीची शासकीय महापूजा गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. या प्रथेनुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक व्हावी, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्वाक्षरीने ई-मेलद्वारे मुख्यमंत्र्यांना रितसर पूजेचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्‍मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंदिर समितीच्या निमंत्रणानुसार पंढरपूरला येऊन महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करावी. राज्याला कोरोनामुक्त करण्याचे साकडे विठुरायाच्या चरणी घालावे, अशा प्रकारच्या अपेक्षा भाविकांमध्ये व्यक्त होत आहेत.

मुख्यमंत्री दशमीला सायंकाळी कुटुंबियांसह हेलिकॉप्टरने पंढरपूरला येतील आणि कोरोना पार्श्‍वभूमीवर मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होईल असे सांगितले जात आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे एका वारकरी दांपत्यास देखील महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे.

Leave a Comment