मोजक्या वारकरी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान


पुणे – आषाढी एकादशी आणि ला़डक्या विठुरायाच्या भेटीला जाण्याची दरवर्षी चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या वारकरी मंडळींमध्ये वारीच्या काळात कमालीचा उत्साह आणि तितकीच उत्सुकता पाहायला मिळते. पण, त्यांच्या या भक्तिमय उत्साहावर यंदाच्या वर्षी मात्र कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्याच पार्श्वभूमीवर विठुरायाच्या भेटीसाठी निघणाऱ्या संतांच्या पालख्यांची परंपराही यंदाच्या वर्षी खंडित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

संतांच्या पालख्या या पालखी सोळ्यानंतर सहसा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. पण ही परंपरा यंदा मात्र मोडत मूळ मंदिरांतच पालख्या स्थिरावणार आहेत. असेच काहीसे चित्र जगतगुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातही पाहायला मिळाले.

मोजक्या वारकरी, मानकऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी महाराजांच्या पालखीने प्रस्थान केले. देहूच्या मंदिरातून टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या नादात पालखीने प्रस्थान केले. देहूमध्ये विठुनामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह असे सर्व वातावरण पाहायला मिळाले. टाळ-मृदुंगाचा थोड्याथोडक्या संख्येने असणाऱ्या वारकऱ्यांनी एकच नाद करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचा उत्साह पाहाण्याजोगा होता.

तुकाराम महाराचांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत पार पडला. पालखी यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसच्या सावटामुळे पायवारीतून नव्हे, तर मोजक्या मंडळींसह थेट पंढरपूरात दाखल होणार आहे. वारकरी वर्गात विठुरायाच्या भेटीसाठी पायीवारीने जाता न येण्याची नाराजी असली तरीही विठुरायाचरणी ते देशावर आणि साऱ्या जगावरच असणाऱ्या या कोरोनारुपी संकटाचा नायनाट व्हावा अशीच प्रार्थना करत आहेत.

Leave a Comment