कोरोना व्हायरस संकटाच्या काळात अंधविश्वासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याचे समोर आले आहे. अनेक ढोंगी बाबा जादूटोणा, कर्मकांड याद्वारे आजार बरा करत असल्याचा दावा करत असतात. मात्र अशा ढोंगी बाबांमुळे मोठे संकट निर्माण होऊ शकते. मध्य प्रदेशच्या रतलाम येथील एका संक्रमित बाबामुळे त्याचे भक्त देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
स्वतः मेला, इतरांनाही कोरोना देऊन गेला हा ‘किस’ बाबा
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अशाच एका असलम बाबाचा 4 जूनला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचे खरे नाव अनवर शाह होते. रतलामच्या नयापुरा भागात तो आपल्या कुटुंबासह मागील 15 वर्षांपासून राहत होता. अनेक लोक त्याच्या जाळ्यात अडकून उपचार करण्यासाठी येत असे. आजार दूर करण्याच्या नावाखाली तो मोठी रक्कम उकळत असे. कोरोना संकटात देखील त्याने आजार बरा करण्याचा दावा केला होता. प्रशासनाने या बाबाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वांरटाईन केले आहे. या बाबामुळे 29 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रतलामच्या नयापूरा येथील हा बाबा जादूटोणा करत असे व लोकांना तावीज देत असे. मोठ्या प्रमाणात लोक त्याच्याकडे येत असे. कधीकधी तो लोकांच्या हाताचे चुंबन देखील घेत असे.

प्रशासन आता या बाबाच्या संपर्कात आलेल्या आणखी लोकांचा शोध घेत आहेत. आता हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एका बाबामुळे कोरोना पसरल्याने आता प्रशासनाने इतर बाबांवर देखील कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. जवळपास 29 बाबांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवले आहे.

तर दुसरीकडे क्वारंटाईन सेंटरमध्ये बंद या दुसऱ्या बाबांची तक्रार आहे की त्यांना कोणतीही सुविधा दिली जात नाही आहे. त्यांची तपासणी देखील करण्यात आली नाही. महामारीच्या काळात त्यांनी काम बंद केले होते, तरी त्यांना पकडून सेंटरमध्ये ठेवले आहे. या सर्व बाबांचे सँपल घेण्यात आले असून, लवकर याचा रिपोर्ट येणार आहे.