बंगळुरू न्यायालयाने मंजूर केला पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणाऱ्या तरुणीला जामीन


नवी दिल्ली – तब्बल चार महिन्यांनंतर नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित संविधान बचाव रॅलीत पाकिस्तानचा झिंदाबादच्या घोषणा देणारी तरुणी अमूल्या लिओना हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशद्रोहाचा गुन्हा अमूल्या हिच्यावर दाखल आहे. सत्र न्यायालयाने तिला गुरुवारी सकाळी जामीन नाकारला होता. पण त्यानंतर बंगळुरू न्यायालयाने रात्री उशीरा तिचा जामीन मंजूर केला.

बंगळुरूमध्ये सीएए, एनसीआर आणि एनपीआर विरोधात फेब्रुवारी महिन्यात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या रॅलीला संबोधित केले होते. अमुल्या या तरुणीने त्यांचे भाषण झाल्यानंतर सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. ओवेसी यांनी तेव्हा धाव घेत अमुल्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिला सभेच्या आयोजकांनीही अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणी खासदार ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला. या तरुणीला आयोजकांनी आंमत्रण द्यायला नको होते. हे मला आधीच माहित असते तर मी आलोच नसतो. आम्ही हिंदुस्थानी असून आमच्या शत्रू राष्ट्राला कधीच पाठिंबा नव्हता. हिंदुस्थानला वाचणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ओवेसी यांनी सांगितले होते.

या तरुणीला काही दिवसांपूर्वी जामीन मिळावा म्हणून बंगळुरूतील मौर्या चौकात काही तरुण तरुणींनी एकत्र येऊन आंदोलन देखील केले होते. एका तरुणीच्या हातात त्या आंदोलनात ‘आझाद कश्मीर’ लिहलेले पोस्टर देखील होते. यावेळी त्या तरुणांनी नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात अटक झालेल्यांच्या सुटकेची मागणी केली.

Leave a Comment