राज ठाकरेंच्या कृष्णकुंजमधील 3 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. पण आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंतही पोहोचला आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. पण राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कोरोनाच्या परिस्थतीमुळे यंदा वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नसल्याचे म्हणत शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा आदेश दिला आहे. त्याऐवजी आहे तिथेच जनतेला मदत करा, अशा सूचना देणारे जाहीर पत्रच कार्यकर्त्यांना उद्देशून राज यांनी लिहिले आहे.

दुसरीकडे, कोरोनाची राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते. आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment