करोना लॉकडाऊनमध्ये मॅगीची घोडदौड

फोटो साभार राज एक्सप्रेस

करोना संकटाने जगातील अनेक उद्योगांचे कंबरडे मोडले असताना नेस्लेच्या मॅगीने जोरदार विक्री करून रेकॉर्ड नोंदविले आहे. लॉकडाऊनच्या काळात मॅगीची विक्री तब्बल २५ टक्के वाढली. २५ मार्च पासून देशात लॉक डाऊन लागू झाला आणि १ जून पासून अनलॉकची सुरवात झाली. ८ जून पासून हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी मिळाली. मात्र या काळात लाखो लोकांनी नाश्ता, रात्रीचे जेवण म्हणून मॅगीला पसंती दिली असल्याचे वाढलेल्या विक्रीवरून स्पष्ट झाले आहे.

गेले दोन महिने हॉटेल्स रेस्टॉरंट बंद असल्याने कामानिमित्ताने बाहेर जेवावे लागणारे तसेच शिक्षणानिमित्त घराबाहेर राहिलेले विद्यार्थी याना मॅगी हा एक चांगला ऑप्शन ठरल्याचे समजते. नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायण म्हणाले या काळात आमच्या सर्व पाची कारखान्याचे उत्पादन वेगाने वाढवावे लागले.

मॅगीची वर्षाची सरासरी उलाढाल १२ हजार कोटींची आहे. यावर्षी त्यात नक्कीच चांगली वाढ नोंदविली जाणार आहे. २०१५ मध्ये मॅगी वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि मॅगीमध्ये शिशे प्रमाण धोकादायक पातळीवर असल्याचे दिसून आल्याने मॅगीवर बंदी घातली गेली होती.

ताज्या अहवालानुसार चार वर्षानंतर म्हणजे २०१९ मध्ये मॅगीच्या विक्रीत पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे म्हटले आहे. बंदीपूर्वी २०१४ मध्ये मॅगीची एकूण विक्री २.५४ मेट्रिक टन होती ती लॉकडाऊनच्या काळात दोन महिन्यात ३.६४ मेट्रिक टनावर गेली असून कंपनीने हे रेकॉर्ड केले आहे. या काळात कंपनीची उलाढाल ३५०० कोटींवर असून बाजारात या क्षेत्रात ८० टक्के हिस्सा मॅगीचा आहे.

Leave a Comment