नकाशा प्रकरणात भारताची बाजू घेणाऱ्या नेपाळी महिला खासदाराच्या घरावर हल्ला

नेपाळच्या संसदेने दोन दिवसांपुर्वी नकाशामध्ये बदल करण्यासाठी संविधान दुरुस्ती विधेयक सादर केले होते. या घटनादुरुस्तीला संसदेने एकमताने मंजुरी दिली. मात्र यावेळी नेपाळच्या खासदार सरिता गिरी यांनी या घटनादुरुस्तीला विरोध केला होता. आता या महिला खासदारांच्या घरावर हल्ले होत असून, त्यांना देश सोडण्याची धमकी देखील मिळत आहे. त्यांच्या घराबाहेर काळे झेंडे लावले जात आहे. तक्रार केली तरी पोलिसांकडून कोणतीही मदत पोहचत नसल्याचे सांगितले जात आहे.

सरिता गिरी या नेपाळच्या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी नकाशाच्या घटनादुरुस्तीला विरोध केला होता. त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, नेपाळ नकाशामध्ये चीनच्या इशाऱ्यावरून बदल करत आहे. नेपाळच्या लोकांना देखील नकाशावरून भारतासोबत वाद नको आहे. नेपाळने या संदर्भात भारत आणि चीनसोबत चर्चा करावी.

गिरी यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नॅशनल यूथ असोसिएशनने त्यांना संसदेमधून त्वरित बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पक्षाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

दरम्यान, नेपाळचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री ईश्वर पोखरेल यांच्यातील चर्चेनंतर काही तासातच नेपाळच्या संसदेने नवीन वादग्रस्त राजकीय नकाशाच्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली होती. या नकाशामध्ये भारताचा भाग असणाऱ्या लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुराला नेपाळने आपला भाग सांगितले आहे.

Leave a Comment