‘तारक मेहता..’मधून गायब होणार नट्टू काका ?


छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ओळखली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्रालाच प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. त्यातच आता या मालिकेमध्ये नट्टू काका ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यापुढे मालिकेत दिसणार नसल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मालिकेच्या चित्रीकरणाला जवळपास अडीच महिने लॉकडाउननंतर जरी परवानगी देण्यात आली असली तरी त्याकरिता सरकारने काही नियमावली जारी केली आहे. त्या नियमावलीनुसार ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या कलाकारांना शूटींगला जाण्यास मनाई असल्यामुळे नट्टू काका आता मालिकेत दिसणार की नाही, अशी चर्चा सुरु होती.

त्यावर ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी म्हणाले, उत्पन्नाचे दुसरे काही साधन वृद्ध कलाकारांकडे नसल्यामुळे त्यांच्या खर्चाचाही मोठा प्रश्न असतो. छोटे-मोठे काम जे करतात, दुकान चालवतात त्यांना परवानगी आहे. पण शूटिंग करण्यास वृद्धांना परवानगी नाही. अशा वेळी त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका कोण साकारणार? सर्वांनी एकत्र येऊन या नियमाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे. शूटिंगला परवानगी देताना सरकारने कलाकार व क्रू मेंबर्सच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे सेटवर कमीत कमी लोक उपस्थित असतील याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे.

Leave a Comment