मागील नऊ दिवसांत कोकणाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही - Majha Paper

मागील नऊ दिवसांत कोकणाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही


श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागील नऊ दिवसात कोकणाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. येथे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना जिथे ठेवले आहे, तेथे त्यांची अवस्था खुराड्या ठेवलेल्या कोबंड्यांसारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत. सर्वात आधी त्या लोकांची राहण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे, असे म्हटले आहे.

कोकणची निसर्ग चक्रीवादळामुळे अवस्था वाईट झाली आहे. नुकसानग्रस्तांना जिथे ठेवले गेले आहे, तेथे त्यांची अवस्था खुराड्या ठेवलेल्या कोबंड्यांसारखी झाली आहे. तेथील लोकांना अत्यंत वाईट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. योग्य ठिकाणी या सगळ्यांची राहण्याची सोय केली पाहिजे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी आहेत. शेती, फळबागांचे झाले तर ते पुढच्या वर्षी भरुन निघत असते. पण येथे तर झाडच राहिली नाहीत. त्यांचे उत्पन्न पुढच्या ५ ते १० वर्षांनी सुरु होईल. अशा स्थितीत फक्त हेक्टरी मदत जाहीर करुन भागणार नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भविष्यात सगळ्या शेतकऱ्यांना १०० टक्के फळबाग अनुदानाचा लाभ दिली पाहिजे. सरकारने केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. मी मासेमारी करणाऱ्या बांधवांचीही भेट घेतली. त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या होड्या खराब झाल्या आहेत. त्यांची किंमत १ ते २ लाख रुपये आहे. मागील काही काळात ३ वेळा वादळाचा फटका बसला असल्यामुळे त्यांना मागील काही दिवसात मासेमारी करण्यासाठीही जाता आलेले नसल्यामुळे मासेमारी करणाऱ्यांना सरकारने थेट आर्थिक मदत द्यावी.

कोकणातील घरांची वादळामुळे मोठी पडझड झाली आहे. सध्या दीड लाख रुपये देऊ असे राज्याने सांगितले आहे. पण एवढ्याने काही होणार नाही. आम्ही आमच्या वेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत केली होती. आता लोकांना घरावर छत लावायची आहेत त्याचाही काळाबाजार सुरु झाला आहे. सरकारने हा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Leave a Comment