कोरोनामुळे भारतीय संघाचा नियोजित श्रीलंका दौरा स्थगित - Majha Paper

कोरोनामुळे भारतीय संघाचा नियोजित श्रीलंका दौरा स्थगित


नवी दिल्ली – कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा जून महिन्यातला श्रीलंका दौरा स्थगित करण्यात आला असून भारतीय संघ आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपल्यानंतर जून महिन्यात श्रीलंकेत ३ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. ही मालिका प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारीही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दाखवली होती. पण आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अद्याप भारत सरकारने परवानगी दिलेली नसल्यामुळे या दौऱ्याबद्दल बीसीसीआयने निर्णय घेतला नव्हता. अखेरीस कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आल्याचे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले.

यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय आयसीसीने जाहीर केलेल्या FTP प्रमाणे लंकेसोबत खेळण्यासाठी कटीबद्ध असल्याचे म्हटले आहे. पण कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे श्रीलंकन बोर्डाने स्पष्ट केले आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला आयपीएलचा तेरावा हंगाम लंकेत आयोजित करण्याचा पर्याय सुचवला होता. पण टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे सध्या सर्व प्रस्तावांवर सावध भूमिका घेण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.

Leave a Comment