अमेरिकेत प्रथमच वायुसेना प्रमुखपदी अश्वेताची निवड

फोटो साभार अमरउजाला

जॉर्ज फ्लॉईडच्या अमानुष हत्येमुळे अमेरिकेच्या १४० पेक्षा अधिक शहरात वंशद्वेषविरोधी आंदोलनांनी जोर धरला असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सेनेमध्ये प्रथमच एका अश्वेताची वायुसेना प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. देशाच्या सिनेटने जनरल चार्ल्स ब्राऊन ज्युनिअर यांची वायुसेनेच्या चीफ ऑफ स्टाफ पदावर सर्वसंमतीने निवड केली. या वेळी झालेल्या मतदानात सर्व ९६ खासदारांनी ब्राऊन यांच्या बाजूने मतदान केले. उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी पुढचा वायुसेना प्रमुख कोण असावा यासाठी मतदान घेताना चार्ल्स ब्राऊन यांच्या नावाची शिफारस केली होती.

जनरल ब्राऊन यांनी ट्विटरवरून या निवडीबद्दल धन्यवाद देताना माझ्या पदाचा काही चांगला उपयोग करू शकेन अशी आशा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात वायुसेनेचा प्रमुख ही अवघड आणि मोठी जबाबदारी असली तरी मी व्यावसायिक वृतीने वर्णद्वेष संपविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनरल ब्राऊन लढाऊ वैमानिक आहेत आणि त्यांना २९०० तासांपेक्षा जास्त विमानोड्डाण करण्याचा अनुभव आहे.

जनरल ब्राऊन म्हणाले, ही संधी मिळाल्याबद्दल मी भावूक झालो आहे आणि त्याचवेळी अनेक आफ्रिकी अमेरिकन लोकांचा विचार करतो आहे ज्यांना फ्लोईड सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. वंश्द्वेश संपविण्याचा माझा नक्कीच प्रयत्न राहील.

अमेरिकी सेनेत उच्चपदावर अश्वेत अगदी कमी प्रमाणात आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार अमेरिकी सेनेत १८.५ टक्के अश्वेत जवान आहेत तर उच्च अधिकारी केवळ ८ टक्के आहेत.

Leave a Comment