फरारी निरव मोदीचे १३५० कोटी किमतीचे हिरे मोती जप्त

फोटो साभार नई दुनिया

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा गंडा घालून फरारी झालेले हिरेव्यापारी निरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे १३५० कोटी रुपये किमतीचे हिरे, मोती आणि दागिने अंमलबजावणी संचालनालय (ई डी)ने हॉंगकॉंग येथून जप्त करून भारतात परत आणण्याची मोठी कामगिरी बजावली आहे. पीएनबी ला गंडा घालून लंडन येथे पळून गेलेला निरव मोदी आणि अँटीगा येथे नागरिकत्व घेऊन लपून बसलेला मेहुल चोक्सी यांच्याविरोधात ईडी सतत कारवाई करत राहिले असून या दोघांनाही भारतात परत आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.

हॉंगकॉंग मधील एका फर्ममध्ये लपविलेला वरील माल १०८ कन्साईनमेंट मध्ये होता त्यातील ३६ निरवचे तर ७६ मेहुलचे आहेत. दुबईतून हॉंगकॉंग येथे पाठविले जात असलेले ३३ कन्साईनमेंट यापूर्वीच जप्त केले गेले असून त्यांची किंमत १३७ कोटी आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या विशेष न्यायालयाने निरवची १४०० कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

हॉंगकॉंगमधून जप्त करण्यात आलेले वरील सामान एका लॉजिस्टीक कंपनीच्या गोदामात लपविले गेले होते. त्याचे वजन २३४० किलो असून ते बुधवारी मुंबईत आणले गेले. हा माल २०१८ मधेच दुबईतून हॉंगकॉंग येथे नेला गेला होता आणि त्याची माहिती तेव्हाच ईडी ला मिळाली होती. मात्र हॉंगकॉंग येथील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यास हा वेळ लागला असे समजते.

Leave a Comment