कपिलदेव कन्या अमियाची बॉलीवूड एन्ट्री

फोटो साभार पत्रिका

भारताला पहिलावाहिला वन डे विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कप्तान कपिल देव याच्या या पराक्रमावर आधारित ८३ नावाचा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार असतानाचा आणखी एक खास बातमी आली आहे. भारताच्या ऐतिहासिक विजयावर कबीर खान यांनी बनविलेल्या या चित्रपटातून कपिलदेव कन्या अमिया हिची बॉलीवूड एन्ट्री झाली आहे. अर्थात अमिया रुपेरी पडद्यावर दिसणार नाही तर तिने कबीर खान यांची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.

८३ चित्रपटात अनेक क्रिकेटपटूंची मुले पडद्यावर प्रथमच दिसतील पण अमियाने त्या सर्वांपेक्षा वेगळी कामगिरी बजावली आहे. अमिया कपिल आणि रोमी देव यांची एकुलती एक कन्या आहे आणि तरीही ती लाईमलाईट पासून नेहमीच दूर राहिली आहे. तिने सर्व फोकस शिक्षणावरच केंद्रित केला होता आणि अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून ती आता बॉलीवूड मधील करियर साठी सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे तिचा पहिलाच चित्रपट वडिलांनी मिळविलेल्या ऐतिहासिक यशावर चित्रित झाला आहे.

या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीरसिंग तर रोमी देव यांच्या भूमिकेत दीपिका पदुकोण आहेत. रणवीरला क्रिकेटचे प्रशिक्षण खुद्द कपिल देव यानेच दिले आहे. चित्रपटाचे शुटींग आणि पोस्ट प्रोडक्शन कामे पूर्ण झाली असून करोना संकटामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे.

Leave a Comment