धक्कादायक! 8 दिवसांनी हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये सापडला बेपत्ता कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह, जळगाव शासकीय हॉस्पिटलचा हलगर्जीपणा

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच जळगावच्या एका शासकीय हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमधील 2 जून पासून बेपत्ता असलेल्या 80 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह 8 दिवसांनी हॉस्पिटलच्याच बाथरूममध्ये सापडला आहे.

हॉस्पिटलनुसार, 1 जूनला महिला हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती. त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दुसऱ्या दिवशी या आजी हॉस्पिटलमधून अचानक गायब झाल्याते आढळले. या संदर्भात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली. आता महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या 80 वर्षीय आजींना कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर जळगावच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र 2 जूनला त्या अचानक गायब झाल्या होत्या. आता महिलेच्या कुटुंबाने त्यांचा मृतदेह त्याच हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये सापडल्याची माहिती दिली आहे.

या संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश डांगे म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे. हा निष्काळजीपणा आहे. हॉस्पिटल्सचे बाथरूम 2-3 दिवसांनी स्वच्छ केले जातात. अशा स्थितीत बाथरूममध्ये महिलेला कोणी कसे बघितले नाही ? या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल.

Leave a Comment